About Department
Department of Marathi
पदवी व पदव्युत्तर विभाग
"लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी "
- सुरेश भट
अभिजात मराठी भाषा
महाविद्यालय व मराठी विभाग याविषयी माहिती :-
विश्वातील सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचे सुलभीकरण करणारी प्रार्थना लिहिणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इ.स.१९५४ साली कराड येथील मुरलीधराच्या मंदिरात स्थापन केली. डॉ. बापूजी साळुंखे यांनी ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार’ हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या खेड्या-पाड्यात, वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविली. या विस्तारलेल्या संस्कार केंद्राची संख्या जवळपास ४०९ च्या आसपास आहे. या संस्कार केंद्रापैक एक संस्कार केंद्र म्हणजे जून १९६२ मध्ये इचलकरंजी शहरात सुरु झालेले “दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज” हे होय. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सूत आणि कपड्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या औद्योगिक शहरात जीवनानुभव घेणाऱ्या कष्टकरी तरुण मनावर साहित्य व भाषेचे संस्कार करत सुशिक्षित, सुसंस्कारी समाज घडवत असताना इचलकरंजीतील साहित्य आणि साहित्येतर कला जोपासून परंपरा अधिक समृद्ध करणारा मराठी विभाग १९६२ पासून कार्यरत आहे. इचलकरंजीच्या जडणघडणीत सहकाराच्या माध्यमातून योगदान देणारे सहकारमहर्षी माजी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या कृतज्ञतेपोटी आज हे महाविद्यालय दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. महाविद्यालयात सन २००८ पासून पदव्युत्तर मराठी विभाग कार्यरत असून या विभागाचे इचलकरंजी व परिसरात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.
मराठी विभागाचा पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिवाजी विद्यापीठ परीक्षेचा निकाल ८०% पेक्षा अधिक आहे. विभागाच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक अशा विविध पातळीवर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो. श्रवण, वाचन, भाषण, लेखन इ. कौशल्ये तसेच रसग्रहणात्मक व सर्जनशील उपक्रमातून वाङ्मयीन व भाषिक उद्दिष्ट्ये साध्य करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. विभागामार्फत कविसंमेलन, साहित्यिक भेट-संवाद, साहित्यिक मुलाखत, पुस्तक प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ चर्चा, भित्तीपत्रिका अनावरण, ‘विवेक’ वार्षिक नियतकालिक संपादन व प्रकाशन, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, भारतीय भाषा दिवस, बाळशास्त्री जांभेकर जयंती - पत्रकार दिन, विवेकानंद जयंती सप्ताह, ज्ञानशिदोरी दिन, इत्यादि असे अनेक उपक्रम राबविले जातात.या कार्यक्रमांच्या निमित्ताने निबंध, वक्तृत्त्व, अभिवाचन इ. स्पर्धा व अभ्यागतांची व्याख्याने आयोजीत केली जातात .
मराठी विभागामार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुलभीकरण, प्रात्यक्षिक अनुभव, सामाजिक भान व साहित्यविषयक जाणिवा प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने कारदगा साहित्य संमेलन, महानुभाव मठ – सातारा, प्रिंट ओम ऑफसेट – सातारा, विश्वकोश निर्मिती मंडळ–वाई, पुस्तकाचे गाव – भिलार, खिद्रापूर, समाजवादी प्रबोधिनी वाचनालय इचलकरंजी, तेजश्री प्रकाशन इचलकरंजी, इ. ठिकाणी शैक्षणिक सहलीचे व क्षेत्रीय भेटींचे आयोजन करण्यात आले.
विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी विभागास सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार श्री. विघ्नेश जोशी, संपादक श्री. प्रसाद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त श्री. राजन मुठाणे, साहित्यिक, समीक्षक डॉ. रवींद्र ठाकूर, कविवर्य अरुण म्हात्रे, कविवर्य महेश केळुसकर, कविवर्य शशिकांत तिरोडकर, कविवर्य वसंत पाटील, ज्येष्ठ कवी पाटलोबा पाटील, साहित्यिक रफिक सुरज मुल्ला, कवी युवराज मोहिते, कथाकार व कवयित्री नीलम माणगावे, कवयित्री वैशाली नायकवडे प्रा. राजा माळगी, प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा. अशोक दास, प्रा. शांताराम कांबळे इ. साहित्यिक मान्यवरांनी भेटी दिल्या. विभागाच्या विविध उपक्रमास समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी, महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, मनोरंजन मंडळ इचलकरंजी, साहित्य विकास मंडळ कारदगा, डोंगरी साहित्य परिषद शिराळा, इ. विविध संस्थांचे सहकार्य लाभले.
मराठी विभागास कार्यक्रम घेताना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सचिव प्राचार्य सौ. शुभांगी गावडे मॅडम, कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन डॉ. आर. व्ही. शेजवळ, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्र.प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.
मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक
लेखक |
लेखकाचा फोटो |
लेखकाची माहिती |
भालचंद्र नेमाडे
(२०१४- हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ)
|
 |
भालचंद्र वनाजी नेमाडे ( २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत. भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of Oriental and African studies, London (१९७१), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुंबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर अध्यासनावरून निवृत्त झाले. तसेच नेमाडे यांनी गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. नेमाडे ’वाचा‘ या अनियतकालिकाचे संपादक होते. (अधिक...) |
विंदा करंदीकर
(२००३- स्वेदगंगा)
|
 |
गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) (जन्मः २३ ऑगस्ट १९१८- मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. (अधिक... ) |
वि. वा. शिरवाडकर
(१९८७- विशाखा)
|
 |
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज): (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. (अधिक...) |
वि. स. खांडेकर
(१९७४- ययाति)
|
 |
विष्णु सखाराम खांडेकर: (११ जानेवारी १८९८–२ सप्टेंबर १९७६). प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक. जन्म सांगलीस. शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्सपर्यंत. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले. १९२० मध्ये शिरोड्याच्या ट्यूटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक. १९३८ मध्ये ह्या शाळेतून निवृत्त. त्यानंतर वास्तव्य कोल्हापूर येथे. लेखन हाच व्यवसाय. खांडेकरांना ययाति कादंबरीबद्दल १९७४-७५ चे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. (अधिक...) |
|